राजपुत्र हॅरी व त्यांच्या पत्नी मेघन मार्कल (दि डय़ूक अँड डचेस ऑफ ससेक्स) यांनी राजघराण्यातून बाहेर पडण्यासाठीच्या औपचारिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे त्यांना ‘हिज अँड हर रॉयल हायनेस’ (एचआरएच) या किताबांचा त्याग करावा लागणार असून, त्यांच्या सेवेसाठी ब्रिटनच्या करदात्यांकडून यापुढे निधी मिळणार नाही.

हे जोडपे यापुढे अधिकृतरीत्या राणीचे प्रतिनिधित्व करणार नाही, असा येत्या काही आठवडय़ांत अमलात येणाऱ्या या कराराचा अर्थ आहे. ‘ससेक्सेस यापुढे राजघराण्याचे सदस्य राहणार नसल्यामुळे ते त्यांच्या एचआरएच खिताबांचा वापर करणार नाहीत’, असे बंकिंगहॅम राजवाडय़ाने शनिवारी रात्री एका निवेदनात सांगितले. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर तयार करण्यात आलेले हे निवेदन आपला नातू व त्याचे कुटुंब यांच्यासाठी ‘विधायक आणि आधार देणारे’ आहे, असे राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सांगितले. ‘हॅरी, मेघन व आर्ची हे नेहमीच माझ्या कुटुंबाचे लाडके सदस्य असतील’, असे ९३ वर्षांच्या राणीच्या खासगी निवेदनात म्हटले आहे.