बरखा दत्त आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी टीका केली आहे. एकेकाळी पत्रकारांची छबी न्यायाधीशांसारखी होती, मात्र आज लोकांपर्यंत बातमी पोहोचविणारे पत्रकार लोकांना आपल्याभोवती आकर्षित करण्यासाठी वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया हर्षा भोगले यांनी फेसबूकवरुन दिली. पत्रकारितेमध्ये दिसणारे हे स्वरुप समाजासाठी धोकादायक असल्याचे सांगत त्यांनी दोन प्रतिष्ठीत वृत्तवाहिनीवरील पत्रकारांना पत्रकारितेचे धडे देण्याचा प्रयत्न  फेसबूकपोस्टच्या माध्यमातून केला. यापूर्वी ‘एनडीटीव्ही’च्या पत्रकार बरखा दत्त यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून ‘टाइम्स नाऊ’चे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना लक्ष्य केले. ‘टाइम्स नाऊ’कडून प्रसारमाध्यमांचा आवाज बंद करण्याची, पत्रकारांवर खटले चालविण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याचा मुद्दा चर्चेला आणण्यात आला. ही मागणी करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना पत्रकार म्हणायचे का? त्यांच्या या मागणीमुळे मला मी पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याची लाज वाटते, असे बरखा यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वी ‘आज तक’ वृत्तवाहिनीकडून अर्णब गोस्वामी यांच्यावर अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती. अर्णब गोस्वामी यांनी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. मात्र, ही एका चमच्याने घेतलेली मुलाखत आहे, असे ट्विट करून ‘आज तक’ने एकच खळबळ उडवून दिली होती. पण नंतर या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती.