नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेमध्ये (डब्ल्यूएचओ) भारत आता महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.भारताच्या करोनाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेले केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे शुक्रवारी डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे सध्या डब्ल्यूएचओच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

कार्यकारी मंडळावर भारताचा प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर १९४ देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पदभार स्वीकारणार ही केवळ औपचारिकता आहे. डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व गटाने कार्यकारी मंडळावर मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या पुढील तीन वर्षांसाठी भारताची निवड करण्याचा निर्णय गेल्या वर्षी एकमताने घेतला.

डब्ल्यूएचओच्या २२ मे रोजी होणाऱ्या बैठकीत हर्षवर्धन यांची कार्यकारी मंडळावर निवड होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अध्यक्षपद प्रादेशिक गटांमध्ये एका वर्षांसाठी आळीपाळीने देण्यात येते आणि भारताचा प्रतिनिधी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षांसाठी मंडळाचा अध्यक्ष असेल असे गेल्या वर्षी ठरविण्यात आले होते. हे पद पूर्णवेळ नसून केवळ कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे गरजेचे आहे.