|| राजेंद्र येवलेकर

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘ब्रेन ड्रेन’ऐवजी ‘ब्रेन गेन’ सुरू झाला असून, रामलिंग स्वामी शिष्यवृत्तीअंतर्गत परदेशातून ६०० भारतीय वैज्ञानिक मायदेशी परत आले आहेत, असा दावा केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. अखिल भारतीय विज्ञान महोत्सवाच्या निमित्ताने ते बोलत होते.

ते म्हणाले, की देशात विज्ञान संशोधनासाठी आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या असून, त्यामुळे परदेशातील भारतीय वैज्ञानिक परत येत आहेत.

देशातील हवा प्रदूषणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतला असून एकूण एकशेदोन शहरांचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यातील ८० शहरांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या शहरांमधील पीएम १० या अतिसूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या शिफारशींचा विचार केला जात आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

अखिल भारतीय विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून आखलेल्या योजनांमुळे देशातील सुमारे एक लाख मुलांना काही काळासाठी विज्ञान प्रयोगशाळांतून काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे, शिवाय त्यांच्यात विज्ञानाची गोडी निर्माण होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

विज्ञान प्रयोगशाळेतील नवीन संशोधन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडले पाहिजे यावर सरकारचा भर असून, एकूण २००पेक्षा अधिक स्टार्टअप सुरू करण्यात यश आले आहे असे सांगून ते म्हणाले, की देशाचा विकास व स्थित्यंतर यात विज्ञानाचा वापर झाला पाहिजे. विज्ञान महोत्सवाच्या निमित्ताने अनेक शहरांत विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत भारताच्या नवनिर्माणाचे स्वप्न साकार करण्याचे ठरवले असून, ते साध्य करण्यासाठी विज्ञान ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. या वेळी विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन डॉ. हर्षवर्धन यांनी केले. विज्ञान तंत्रज्ञान सचिव आशुतोष शर्मा, जैवतंत्रज्ञान सचिव रेणू स्वरूप, विज्ञान भारतीचे जयंत सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते. युवा वैज्ञानिक संमेलनाने महोत्सवाची सुरुवात झाली.