अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात हार्वर्ड विद्यापीठ आणि एमआयटीने कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.

करोना साथीमुळे अमेरिकेतील ज्या विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत त्या विद्यापीठांच्या परदेशी विद्यार्थ्यांची मायदेशी रवानगी करावी, असा आदेश ट्रम्प प्रशासनाने काढला आहे. अमेरिकेतील भारतीय आणि इतर परदेशी विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आणणारा निर्णय ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतर विभागाने घेतला आहे. हार्वर्ड आणि एमआयटी या अमेरिकेतील नामवंत शिक्षण संस्थांनी या निर्णयाला थेट कोर्टात आव्हान दिले आहे.

हा निर्णय बेकायद आणि अत्यंत क्रूर असल्याचे म्हटले आहे. आम्ही आमच्या परदेशी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणासाठी अमेरिकेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार अशी भूमिका या शिक्षण संस्थांनी घेतली आहे.
परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहून शिकायचे असेल तर जिथे ऑनलाइन शिक्षण नाही अशा संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. जर परदेशी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण नसलेल्या संस्थांत प्रवेश घेतला नाही तर त्यांना देशातून परत पाठवण्यात येईल, असे स्थलांतर विभागाने म्हटले आहे.

ज्या संस्थांत संमिश्र शिक्षण आहे तेथे या विद्यार्थ्यांना तीन श्रेयांक तासांपैकी एकवर्ग ऑनलाइन करता येईल. त्यामुळे त्या संस्थांना नेमके किती विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेतात याची प्रमाणपत्रे जारी करावी लागणार आहेत. या निर्णयामुळे भारतीय व परदेशी विद्यार्थ्यांत नैराश्याचे वातावरण पसरले आहे. करोना साथीमुळे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंध कडक केले आहेत त्याचाच हा भाग असला तरी त्यामागची कारणमीमांसा समजू शकलेली नाही.