हरयाणातील सोनिपत येथे सरकारी शाळेच्या मैदानात १८ वर्षांच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या आरोपीने पाच महिन्यांपूर्वीच मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या भावाचीही हत्या केली होती.

सोनिपतमधील मदिना गावात राहणाऱ्या राजेश सिंह हा विद्यार्थी शाळेच्या मैदानात बहिणीची वाट बघत थांबला होता. त्याच्या बहिणीचा दहावीचा पेपर सुरु होता. यादरम्यान, एका कारमधून चार जण आले आणि त्यांनी राजेशवर गोळीबार केला. त्यांनी राजेशवर तब्बल १० गोळ्या झाडल्या. या गोळीबारात राजेशचा मित्र सावनकुमार हा देखील जखमी झाला. त्याच्या पोटात गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे बोर्डाची परीक्षा सुरु असल्याने शाळेबाहेर पोलीस तैनात होते. ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबाराचा आवाज ऐकून मैदानाकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांदेखतच आरोपी पसार झाले. मात्र यानंतरही हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. चार हल्लेखोरांपैकी दोघांची ओळख पटली आहे. या दोघांनी गेल्या वर्षी राजेशचा मोठा भाऊ राकेशचीही हत्या केली होती. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हत्येत राजेश हा साक्षीदार होता. या घटनेनंतर पोलिसांवर टीका होत आहे.

राजेशचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हत्येच्या निषेधार्थ महामार्ग रोखून ठरला. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली.