हरियाणामधील भाजप नेते दर्शन नागपाल यांच्यावर गंभीर आरोप झाला आहे. नागपाल यांनी रुग्णवाहिका अडवून धरल्याने त्यातील रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. नागपाल यांनी रुग्णवाहिका अर्धा तास थांबवून ठेवल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. रुग्णवाहिकेने नागपाल यांच्या गाडीला धडक दिल्याने त्यांनी रुग्णवाहिका अडवून ठेवली, असा आरोप करत कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हरयाणाच्या फतेहाबादमध्ये भाजप नेते दर्शन नागपाल यांच्या वाहनाला एका रुग्णवाहिकेने धडक दिली. यानंतर संतप्त झालेल्या नागपाल यांनी रुग्णवाहिका रोखून धरली. यावेळी रुग्णवाहिकेमधील रुग्णाच्या नातेवाईकांनी नागपाल यांच्याकडे अनेकदा विनंती केली. मात्र तरीही नागपाल यांनी रुग्णवाहिकेचा मार्ग रोखून धरला. अर्धा तासानंतर नागपाल यांनी रुग्णवाहिकेला जाऊ दिले. मात्र रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मृताचे नातेवाईक राम सोनी आणि अरुण सोनी यांनी दर्शन नागपाल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ‘शनिवारी काकांची तब्येत अचानक बिघडली. त्यावेळी आम्ही त्यांना कुटुंबातील काही जणांसह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात होतो. त्यावेळी लालबत्ती चौकात नगराध्यक्ष दर्शन नागपाल यांची गाडी पुढे आल्याने रुग्णवाहिकेची धडक त्यांच्या गाडीला बसली. त्यानंतर नागपाल यांनी जवळपास अर्धा तास रुग्णवाहिका रोखून धरली. त्यामुळे काकांना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,’ अशी माहिती राम सोनी आणि अरुण सोनी यांना दिली.

मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांवर दर्शन नागपाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मृताच्या नातेवाईकांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रुग्णवाहिकेने वाहनाला मागून धडक दिली होती. मात्र रुग्ण असल्याने रुग्णवाहिका थांबवली नाही,’ असे नागपाल यांनी सांगितले. ‘रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाशी बोललो,’ असेदेखील नागपाल यांनी म्हटले.