बाजार समितीच्या अधिकाऱ्याला आधी हाताने व नंतर चपलेनं मारहाण प्रकरणी भाजपा नेता सोनाली फोगाट यांना पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी फोगाट यांना हिसार न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी न्यायालयानं त्यांची जामीनावर सुटका केली.

हरयाणातील भाजपा नेता सोनाली फोगाट यांना हिसार पोलिसांनी बुधवारी अटक केली. हिसारमधील बालासमंद येथील बाजार समितीच्या सचिवाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणात बाजार समितीचे सदस्य व व्यापाऱ्यांनी काही दिवसांपासून फोगाट यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. बुधवारी पोलिसांनी सोनाली फोगाट यांना अटक केली. त्यानंतर त्यांना हिसार येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं फोगाट यांची जामीनावर सुटका केली.

नेमकं काय घडलं होतं?

५ जून रोजी हिसार जिल्ह्यातील बालसमंद येथे टिकटॉक स्टार व सध्या भाजपाच्या पदाधिकारी असलेल्या सोनाली फोगाट यांनी बाजार समितीचे सचिव सुलतान सिंह यांना मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. सोनाली फोगाट यांनी या अधिकाऱ्याला आधी हाताने व नंतर चपलेनं मारहाण केली होती. बाजार समितीच्या सचिवांनी माझ्याविषयी बोलताना खूप वाईट भाषेत वापर केला, असा आरोप करत फोगाट यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली होती.

सोनाली फोगाट कोण आहेत?

सोनाली फोगाट या टिकटॉकवर खूप प्रसिद्ध आहेत. त्या नेहमी व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट करत असतात. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर गेल्या वर्षी सोनाली फोगाट यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत फोगाट यांना पराभव स्वीकारावा लागला होता.