11 December 2017

News Flash

स्वातंत्र्यदिनी शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

बलात्कार करणारा नराधम सुमारे ४० वर्षांचा

चंदिगड | Updated: August 15, 2017 3:15 PM

प्रतिकात्मक छायाचित्र

हरयाणामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरुन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. बलात्कार करणारा नराधम सुमारे ४० वर्षांचा असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

चंदिगडमधील सेक्टर २४ मध्ये राहणारी पीडित मुलगी मंगळवारी सकाळी ध्वजारोहणासाठी शाळेत गेली होती. पीडित मुलगी ८ वीत शिकते. सकाळी अकराच्या सुमारास ती घरी परतण्यासाठी निघाली. सेक्टर २३ येथे पीडित मुलीने घरी जाण्यासाठी शॉर्टकटचा पर्याय निवडला. सेक्टर २३ मधील बागेजवळ नराधमाने पीडित मुलीला गाठले आणि रस्त्यालगतच्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर नराधमाने घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर पीडित मुलीने स्थानिकांच्या मदतीने घर गाठले आणि घरी जाऊन पालकांना घटनेची माहिती दिली. पालकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सेक्टर १७ मधील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आम्ही घटनास्थळाची पाहणी केली असून पीडित मुलीकडूनही आम्हाला पुरेशी माहिती मिळाल्याची माहिती चंदिगडमधील पोलीस उपअधीक्षक इश सिंघल यांनी दिली.

चंदिगडमधील बलात्काराच्या घटनेने शहरातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरुणींचा पाठलाग केल्याच्या दोन घटना ताजी असतानाच आता एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली.

First Published on August 15, 2017 3:15 pm

Web Title: haryana chandigarh 8th standard girl allegedly raped while returning from school after independence day celebrations