हरयाणातील महेंद्रगड जिल्ह्यात ११ वीच्या विद्यार्थ्याच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बहिणीशी प्रेमसंबंध असल्याने ११ वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेंद्रगड जिल्ह्यातील इसराना गावात राहणाऱ्या प्रदीप सिंग (वय १८) या विद्यार्थ्याचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण मुलीच्या भावाला लागली होती. प्रदीप हा दुसऱ्या जातीतील असल्याने लग्न झाल्यास समाजात नाचक्की होईल, असे त्याने बहिणीला सांगितले होते. बुधवारी मुलीच्या भावाने काही साथीदारांच्या मदतीने प्रदीपला गाठले. त्याला काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच संबंधीत मुलीनेही घटनास्थळी धाव घेतली. कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या शेतात हा सर्व प्रकार घडला. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मुलगी त्या मुलाच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होती. तिला मानसिक धक्का बसला होता, असे घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणी मुलीचा भाऊ प्रितम व त्याच्या सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरु असून मुलीला तिच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याने तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.