मुख्यमंत्र्यांच्या किसान पंचायत कार्यक्रमाच्या मंडपाची मोडतोड 

चंडीगड : लाठीमार, अश्रुधुराचा मारा, पाण्याचे फवारे झेलत आणि पोलिसांचे संरक्षक अडथळे तोडत हरियाणातील शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नियोजित किसान महापंचायत कार्यक्रमाच्या मंडपाची मोडतोड केली. त्यामुळे त्यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला.

केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी कसे लाभदायक आहेत, हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्य़ातील केमला खेडय़ात तेथील भाजप सरकारने महाकिसान पंचायत आयोजित केली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री खट्टर यांचे भाषण होणार होते. परंतु नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी निदर्शने सुरू केली.  पोलिसांनी उभारलेले अडथळे तोडत संतप्त शेतकऱ्यांनी गावाकडे कूच केली. या कार्यक्रमासाठी दीड हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. गावात सात ठिकाणी तपासणी चौक्या उभारण्यात आल्या होत्या. पोलीस आणि आंदोलक यांच्यात अनेक ठिकाणी झटापट झाली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. लाठीमारही केला. परंतु त्याला न जुमानता आंदोलक शेतकऱ्यांनी सहा संरक्षक चौक्यांवरील पोलिसांची सुरक्षा भेदून गावात प्रवेश केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी तयार केलेल्या हेलिपॅडकडे धाव घेतली. त्यामुळे सर्व पोलीस फौजफाटा हेलिपॅडकडे रवाना झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा कार्यक्रमस्थळाकडे वळवला.

महापंचायत कार्यक्रमासाठी अद्ययावत भव्य मंडप उभारण्यात आला होता. तेथे भाजपसमर्थक सुमारे दोन हजार शेतकरी उपस्थित होते. आंदोलक शेतकरी तेथे पोहोचले. त्यांनी खुर्च्याची मोडतोड केली. फलक फाडले. व्यासपीठाचीही नासधूस केली. तेथेही त्यांची पोलिसांशी झटापट झाली. परंतु या धुमश्चक्रीत किती जखमी झाले किंवा किती मालमत्तेचे नुकसान झाले, याची माहिती हाती येणे बाकी आहे.

केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून हरियाणातील भाजप आणि त्याचा मित्रपक्ष जननायक जनता पार्टीच्या नेत्यांविरोधात ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्र कायदे मागे घेणार नाही

कृषी कायद्यांतील काही मुद्यांवर चर्चा होऊ शकते. मात्र, केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेणार नाही, असे वाटते, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. अशा वर्तनातून आंदोलकांनी शेतकऱ्यांना बदनाम केले असून, त्यामागे कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा हात आहे, असा आरोपही खट्टर यांनी केला.

कार्यक्रम रद्द

संतप्त आंदोलक-पोलीस यांच्यात झालेली धुमश्चक्री, गावातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांनी केलेली मंडपाची मोडतोड लक्षात घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी महाकिसान पंचायत कार्यक्रमच रद्द केला