रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पदकाची कमाई करुन देणारी भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही दोन नावे सध्या भारतीयांच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहे. खेळाचे मैदान गाजविल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडीच नव्हे, तर सोशल माध्यमांवरही या दोन नावांची चलती असल्याचे पहावयास मिळत आहे.  हरियाणाचे मुख्यमंत्री बॅडमिंटनपटू सिंधूच्या नावाचा उच्चार करताना गडबडून गेल्याचे पहावयास मिळाले. ऑलिम्पिकच्या मैदानातून कास्य पदक मिळवून परतलेल्या साक्षी मलिकचा बुधवारी हरियाणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर देशाच्या दोन मुलींनी देशाचा गौरव केल्याचे भाष्य खट्टर यांनी केले. यावेळी साक्षीसोबत सिंधूच्या नावाचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर सिंधूचे नाव विचारावे लागले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सिंधूचे नाव विसरले इतकेच नव्हे, तर तिचा प्रांतही त्यांनी बदलून टाकला.  कार्यक्रमामध्ये त्यांनी रौप्य पदक विजेत्या सिंधूच्या नावाची माहिती घेतल्यानंतर सिंधू कर्नाटकची असल्याचे म्हटले. हरियाणा सरकारने साक्षीसोबत पी.व्ही. सिंधूला देखील ५० लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. रिओहून बुधवारी सकाळी साक्षी हरियाणात आली. बहादूरगड येथे राज्य सरकारने स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी साक्षीला २.५ कोटी रूपयांचा धनादेश प्रदान केला. पदक पटकावल्यानंतर प्रथमच हरियाणामध्ये आलेल्या साक्षीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. साक्षी मलिकला  ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आली.