हरयाणाच्या बहादूरगडमध्ये कूलर बनवण्याच्या फॅक्टरीत लागलेल्या भीषण आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या या आगीवर ताबा मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला 20 तासांहून अधिक वेळ लागला.

‘ट्रिब्यून इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी क्रिएटिव्ह हायटेक नावाच्या फॅक्टरीत आग लागली होती. मृतांची ओळख पटली असून दिपक ठाकूर (पाटणा, बिहार) आणि शोएब अंसारी (मेरठ, उ.प्र.) अशी मृतांची नावं आहेत. श्वास गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विषारी धुरामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळेस मृत दोघेही फॅक्टरीत काम करत होते.

आज(दि.22) सकाळी आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमनच्या अधिकाऱ्यांना फॅक्टरीच्या आतमध्ये जाण्यास यश आलं. त्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.