राष्ट्रीय महिला कराटेपटूची छेड काढल्याप्रकरणी रोहतक येथील एका वाहतूक पोलिसाला अटक करण्यात आलेली आहे. शेअर रिक्षामधून जात असताना हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय. या प्रकारानंतर महिला कराटेपटूने वाहतूक पोलिस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या अधिकाऱ्याला अटक केली आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर महिला कराटेपटूने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी कराटे क्लास संपवून येत असताना महिला शेअर रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाली. यावेळी वाहतूक पोलिसाने संधी साधत याच रिक्षाच बसत महिला खेळाडूची छेड काढण्यास सुरुवात केली. यावेळी मला तुझ्यासोबत मैत्री करायची आहे असं म्हणत वाहतूक पोलिसाने आपल्याजवळ फोन नंबर मागितल्याचंही महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यादरम्यान वाहतूक पोलिसाने महिला खेळाडूला स्पर्श करत त्रास द्यायला सुरुवात केली. यानंतर महिला खेळाडूने रिक्षाचालकाला पोलिस ठाण्याकडे नेण्यास सांगितलं.

सुरुवातीला पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास मनाई केली. मात्र रोहतक पोलीस अधिक्षक पंकज नैन यांच्याकडे यांना या प्रकरणाची माहिती समजताच, त्यांनी तात्काळ या प्रकरणात दखल घेत वाहतूक पोलिसाला अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी वाहतूक पोलिसावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.