हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी  उद्या मतदान होणार असून, १३५१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त होणार आहे. हरयाणात यापूर्वी प्रामुख्याने काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षात लढत होती, मात्र या वेळी भाजपनेही निवडणुकीत मोठे आव्हान दिले आहे.
हरयाणातील ९० जागांसाठी १.६३ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामध्ये ८७.३७ लाख महिला मतदार आहेत. तर एकूण १०९ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा, रणदीप सूरजेवाला (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे पुत्र अभय, सून नयना आणि नातू दुष्यंत (भारतीय राष्ट्रीय लोकदल), माजी केंद्रीयमंत्री विनोद शर्मा आणि त्यांची पत्नी शक्तीराणी (एचजेसीपी – व्ही), माजी खासदार कुलदीप बिश्रोई, त्यांची पत्नी रेणुका आणि ज्येष्ठ बंधू माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन (एचजेसी-बीएल) हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हरयाणा भाजप प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा आणि अभिमन्यू (भाजप), अरविंद शर्मा (बसपा) आणि गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ कांडा (एचएलपी) हे उमेदवारही रिंगणात आहेत. लोकसभेप्रमाणेच या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा पक्षाला लाभ होईल आणि प्रथमच पक्ष स्वबळावर हरयाणात सरकार स्थापन करील, अशी भाजपला अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणात झंझावाती प्रचार करून पक्षाला एक संधी देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे तर काँग्रेस तिसऱ्यांदा विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुकीत उतरला आहे.