देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागल्यानंतर लॉकडाउन शिथील करण्याची मागणी जोर धरू लागली. केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय राज्य सरकारांच्या हाती सोपवला आहे. त्यामुळे राज्यात पाठीपुढे लॉकडाउनच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. काही राज्यांनी करोनास्थिती आटोक्यात राहावी यासाठी लॉकडाउनचा अवधी वाढवला. तर काही राज्यांनी १ जूननंतर काही नियमांमध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. हरयाणा सरकारने करोना स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर ७ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात दुकानं सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी दुकानदारांना सम-विषम फॉर्म्युलाचं पालन करावं लागणार आहे.

हरयाणातील लॉकडाउन नियमावली

    • राज्यात दुकानं सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी
    • दुकानदारांना सम-विषम फॉर्म्युलाचं पालन करावं लागणार
    • १५ जूनपर्यंत शाळा, महाविद्यालयं बंद असतील
    • रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू असेल
    • शॉपिंग मॉल्स नियमांचं पालन करत सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु राहतील
    • मॉलमधील क्षेत्रफळाच्या आधारावर प्रवेश मिळणार
    • एक व्यक्ती मॉलमध्ये एक तास थांबू शकणार आहे

हरयाणात मागच्या २४ तासात दोन हजाराहून कमी करोना रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण कमी होत असले तरी यापैकी सर्वाधिक रुग्ण हिसारमध्ये आढळून आले आहेत. राज्यात रुग्णवाढीचा दर हा ३.८८ टक्के आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला रुग्णवाढीचा दर हा १४.७९ टक्के इतका होता. हरयाणात करोनानंतर ब्लॅक फंगसने डोकं वर काढलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६८८ ब्लॅक फंगसचे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण ८१० ब्लॅक फंगस रुग्णांपैकी ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.