आश्चर्यचकित करायला लावणारी बातमी समोर आली आहे. करोनावर तयार करण्यात येत असलेली कोवॅक्सिन लसीचा ट्रायल डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी कोवॅक्सिनचा ट्रायल डोस घेतलेल्या विज करोना पॉझिटिव्ह निघाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

करोना झाल्याचं कळाल्यानंतर विज यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यांना उपचारासाठी अंबाला येथील छावणीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करून घेण्याचं आवाहनही विज यांनी केलं आहे.

हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. मात्र, त्यांना करोनाची लागण झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. करोनाची लागण झालेल्या अनिल विज हे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये सहभागी झाले होते. महिनाभरापूर्वी कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी विज यांनी स्वतःचं नाव दिलं होतं. रोहतकमध्ये त्यांनी लसीचा डोस घेतला होता.

देशात करोनावर परिणामकारक ठरणाऱ्या लसी तयार करण्याच काम सुरू आहे. यामध्ये कोवॅक्सिन लसीचाही समावेश आहे. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस असून, भारत बायोटेक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्यानं विकसित केली आहे. या लसीच्या चाचण्या सुरू असून, ही लस करोनावर प्रभावी असून, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.