रॉबर्ट वडरा यांचे जमीन खरेदी-विक्रीचे संशयास्पद व्यवहार उघडकीस आणल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सनदी अधिकारी अशोक खेमका यांची हरयाणा सरकारने कमी महत्त्वाच्या पदावर बदली केली. चोवीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांची ही ४६वी बदली आहे. खेमका यांनी या बदलीचे वर्णन ‘वेदनादायक’ असे केले असून, मुख्यमंत्र्यांनी ही ‘नियमित बदली’ असल्याचे म्हटले आहे. आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी खेमका यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत हरयाणा परिवहन विभागाचे आयुक्त व सचिव असलेले अशोक खेमका यांची भाजप सरकारने बुधवारी पुरातत्त्वशास्त्र व संग्रहालये विभागात बदली केली. परिवहन खात्यात अनेक मर्यादा आणि हितसंबंध असूनही या खात्यातील भ्रष्टाचाराची दखल घेऊन सुधारणा करण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला. तरीही झालेली बदली आपल्यासाठी ‘वेदनादायक’ असल्याची प्रतिक्रिया खेमका यांनी व्यक्त केली आहे. भाजपने ही बदली चांगल्या कारणासाठी होती असा युक्तिवाद केला आहे.