‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहिमची दत्तक कन्या हनीप्रीतला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान हनीप्रीत रडत होती.

बाबा राम रहिम सिंगला बलात्कारप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी हनीप्रीतसह डेरा सच्चा सौदाच्या अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. ३८ दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या हनीप्रीतला मंगळवारी दुपारी पंजाबमधील झिरकापूर – पतियाळा रस्त्यावरुन अटक करण्यात आली होती.

बुधवारी हनीप्रीतला हरयाणातील न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान हनीप्रीत रडत होती. मी निर्दोष असून माझ्यावर दया करा, अशी विनवणी तिने न्यायाधीशांकडे केली. हरयाणा पोलिसांनी हनीप्रीतला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती न्यायालयात केली. हनीप्रीतच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने हनीप्रीतला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता हनीप्रीतच्या पोलीस चौकशीतून बाबा राम रहिमविषयी आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

बाबा राम रहिमला दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या ४३ मोस्ट वाँटेड गुन्हेगारांची यादी हरयाणा पोलिसांनी जाहीर केली होती. यामध्ये हनीप्रीत आणि आदित्य इन्सान यांचाही समावेश होता. हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा असली तरी मी नेपाळला गेले नाही, असा दावा हनीप्रीतने चौकशीदरम्यान केल्याचे समजते. पंजाबमधील भटिंडा येथील ‘डेरा’ समर्थकाच्या घरात लपून बसले होते, असे तिने पोलिसांना सांगितले.

हनीप्रीतने अटकेपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ‘सत्याचा विजय होईल. ज्या काही गोष्टी आमच्यासोबत घडल्या आहेत, त्यामुळे मला धक्का बसला आहे. आम्ही देशभक्त असून आमचे देशावर प्रेम आहे,’ असे तिने सांगितले होते.