महात्मा गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा मोठा ब्रँड आहे, असे वक्तव्य करून हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवरील गांधींचे छायाचित्र हटवून त्याजागी नरेंद्र मोदींचे छायाचित्र वापरण्यात आले, हे चांगलेच झाले. आगामी काळात हळूहळू चलनातील नोटांवरूनही गांधींजींचे छायाचित्र काढले जाईल, असे वीज यांनी म्हटले. साहजिकच वीज यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. भाजपनेही विज यांच्या वक्तव्याचा निषेध करत ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वीज यांनी हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी केलेले वक्तव्य हे माझे महात्मा गांधीजी यांच्याबद्दलचे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी हे वक्तव्य मागे घेतो, असे वीज यांनी म्हटले.

सध्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिका आणि रोजानिशींवर महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर वीज यांनी हे वक्तव्य केले. महात्मा गांधी यांचे नाव खादीशी जोडले गेल्याने खादीची दुर्दशा झाली आहे. खादीसाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी हेच योग्य ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. जेव्हापासून गांधीजींचे नाव खादीशी जोडले गेले आहे तेव्हापासून खादी व्यवसाय डबघाईला आला आहे, असा अजब तर्कही वीज यांनी मांडला. तसेच गांधींजींचे नावच असे आहे की, ज्यादिवशी त्यांचे छायाचित्र नोटेवर छापले त्याचदिवशी चलनाचे अवमूल्यन झाले, असे तारेही वीज यांनी तोडले.

खादीसोबत गांधींजींचे नाव असायला हवे असे काही पेटंट नाही. त्यामुळे उगाच वाद निर्माण करू नये. मोदींचा चेहरा खादी आणि ग्रामोद्योगच्या दिनदर्शिकेवर छापताच खादीची विक्री १४ टक्क्यांनी वाढली, असेही वीज यांनी सांगितले. हरियाणा सरकारमध्ये आरोग्य आणि क्रीडामंत्री असलेल्या वीज यांनी यापूर्वीही अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली आहे.