हरियाणाचे आरोग्य आणि क्रीडामंत्री अनिल वीज शुक्रवारी एका बैठकीत आयपीएस महिला अधिकाऱ्यास चक्क गेट आउट असे म्हणाले. मात्र, सदर महिला अधिका-याने मी नाही जाणार असे प्रत्युत्तर दिले. त्यावर रागाच्या भरात मंत्रिमहोदय स्वत:च बैठकीतून बाहेर पडले. या घटनेने नेते आणि अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
वीज हे जनतक्रार निवारण समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवत होते. पंजाबच्या सीमावर्ती भागात दारूची तस्करी थांबवण्यात पोलिसांची भूमिका काय, असा प्रश्न वीज यांनी केला होता. त्यावेळी पोलीस कारवाई करत असून आत्तापर्यंत अडीच हजार गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्यापैकी बरेच आरोपी जामीनवर सुटले असल्याचे पोलीस अधीक्षक संगिता यांनी सांगितले. पण, संगिता यांच्या उत्तराने मंत्रीसाहेबांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक संगिता कालिया यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, आपली काहीही चूक नसल्यामुळे कालिया यांनी बैठकीतून बाहेर पडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर रागाच्या भरात वीज स्वत:च बैठकीतून बाहेर पडले.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर संगीता कालिया यांच्या बदलीचे आदेशही काढण्यात आल्याचे समजते.