हरयाणातील मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद

काँग्रेसच्या सर्व नेत्यांची केलेल्या सर्व गैरकृत्यांबद्दल त्यांची डीएनए चाचणी करण्यात यावी, असे वक्तव्य करून हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी गुरुवारी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आपण दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सून असल्याने कोणालाही घाबरत नाही, असे वक्तव्य बुधवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले होते त्यावरही विज यांनी टीका केली आहे.
गैरकृत्य करण्यास काँग्रेसचे नेते घाबरत नाहीत हे प्रत्येकाला माहिती आहे, काँग्रेसच्या नेत्यांचा तोच डीएनए आहे, असे विज यांनी ट्विट केले आहे. देशावर आणीबाणी इंदिरा गांधी यांनी लादली. त्यांचा आत्मा काँग्रेसच्या सर्व नेत्यांमध्ये अद्यापही जिवंत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे आणि रॉबर्ट वढेरा यांच्यासमवेत मालमत्ताविषयक व्यापार सुरू करावा आणि त्याला ‘राहुल अ‍ॅण्ड वढेरा प्रॉपर्टीज’ असे नाव द्यावे, असा सल्लाही विज यांनी दिला आहे.