बलात्काराच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ आणि आरोपीची शिक्षा यांबाबत हरयाणा सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. १२ वर्ष किंवा त्याहून लहान वयाच्या मुलीवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. अशाप्रकारे कठोर नियम झाल्याने लहान मुलींवरील बलात्काराचे प्रमाण कमी होईल अशी सरकारला आशा आहे. यासंदर्भातील विधेयक लवकरच विधानसभेत सादर होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतेच दिले. आता मध्यप्रदेशमध्ये १२ वर्षांच्या आतील मुलीवर बलात्कार झाल्यास संबंधित गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, त्यापाठोपाठ आता हरयाणामध्येही अशाप्रकारची तरतूद होण्याची शक्यता आहे.

मागच्या काही दिवसांत हरयाणामध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. यामुळे खट्टर यांच्या सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीकाही होत आहे. तसेच लहान वयातील मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना जास्त असल्याने याविषयात कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे खट्टर म्हणाले. याशिवाय बलात्काराच्या घटनांचा लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरु करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मागील वर्षी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या घटनांमधील २५ टक्के घटना या बनावट असल्याचेही खट्टर यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच माध्यमांनीही बलात्काराच्या बातम्या देताना विशेष काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

खट्टर म्हणाले, सध्या बलात्काराच्या घटनांमध्ये ७५ टक्के गुन्हेगार हे संबंधित मुलगी किंवा महिला हिच्या नात्यातील असल्याचे समोर येते. त्यामुळे पोलिसांबरोबरच नागरिकांनीही अशा घटना घडू नयेत याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. याशिवाय राज्यात सध्या प्रलंबित असलेल्या बलात्काराच्या घटनांचा तपास लवकरात लवकर लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. हरयाणामध्ये एका ११ वर्षांच्या आणि १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन त्यांचा खून करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर खट्टर यांनी आपले म्हणणे स्पष्ट केले.