समांतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) स्थापन करण्याचा हरयाणा सरकारचा निर्णय देशाच्या ऐक्यावर घाला घालणारा आहे, असे मत पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी व्यक्त केले आहे. बादल यांनी शुक्रवारी गृहमंत्री राजनाथ सिंग आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली.
हरयाणा सरकारच्या निर्णयामुळे देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचणार आहे, हा अखंडत्वावरील हल्ला आहे, असेही बादल यांनी चर्चेनंतर वार्ताहरांना सांगितले.
हरयाणा सरकारने भारत सरकारच्या अधिकाराला आव्हान दिले असून त्यांनी घटनेतील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक अनुच्छेदाचे उल्लंघन केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. केंद्राचा आदेश धुडकावून समांतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती स्थापन करण्याचा निर्णय हरयाणा सरकारने घेतला होता. याविरोधात मोर्चा काढण्याची तयारी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी दर्शविली असून त्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली आहे.
शीखांच्या धर्मस्थळांचा कारभार पाहण्यासाठी ब्रिटिश राजवटीत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची स्थापना झाली असून स्वतंत्र प्रबंधक समिती स्थापण्याचा राज्यांना कायदेशीर अधिकारच नाही, असे पंजाब सरकारचे म्हणणे आहे.