वीज वितरक कंपनीने बिलांमध्ये केलेल्या गोंधळाच्या अनेक बातम्या यापूर्वी तुम्ही नक्कीच वाचल्या असतील मात्र हरयाणामधील सिरसामध्ये वीज विभागाने घातलेल्या एका गोंधळाची जोरदार चर्चा असून याबद्दल वाचून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. येथील कलांवली परिसरामधील एका राईस मिलला वीज कंपनीने तब्बल ९० कोटी रुपयांचं बिल पाठवलं आहे. अर्थात ही गोष्ट तांत्रिक गडबडीमुळे झाल्याचं वीज विभागाने नंतर स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये बंद पडलेल्या या राईस मीलला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल पाठवण्यात आल्याने राईस मीलच्या संचालकांची झोपच उडाली. सामान्यपणे कंपनीचं बिल हे पाच ते सहा लाखांपर्यंत येतं. मात्र नुकतच त्यांना ९०.१३७ कोटींचं बिल वीज विभागाने पाठवलं.

नक्की वाचा >> गुजरातमध्ये दोन महिन्याच्या बाळाला 24*7 पोलीस सुरक्षा; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हा संपूर्ण प्रकार सिरसा येथील कलांवली परिसरात असणाऱ्या गणेश राइस इंडस्ट्रीज या राईस मीलसोबत घडलाय. राइस मिलच्या संचालकांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधाना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वीजेचं बिल पाठवण्यात आल्याचं हा पहिलाच प्रकार आहे. सामान्यपणे आम्ही जेवढी वीज वापरतो त्यानुसार महिन्याला पाच ते सहा लाखांच्या दरम्यान बिल येतं. मात्र यंदा तर वीज बिलाच्या आकड्याने धडकीच भरवलीय, असं सांगितलं. पुढे बोलताना एखाद्या वेळेस कारभार आधीप्रमाणे सुरु असता तर बिल अधिक येणं समजू शकतो मात्र लॉकडाउनमुळे राईस मील बंद असतानाही एवढं बिल आल्याने आश्चर्य वाटत आहे.

नक्की वाचा >> खोदकाम करताना सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा; हिऱ्याचा आकार पाहून थक्क व्हाल

९० कोटी हा बिलाचा आकडा वीज वापराशी हा काहीही संबंध नसणारा आहे, असंही संचालकांनी म्हटलं आहे. करोना लॉकडाउनमुळे मागील अनेक महिन्यांपासून राईस मील आणि इतर छोटेमोठे उद्योग हे पूर्णपणे किंवा काही प्रमाणात बंद असल्याने आधीप्रमाणे या कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात वीज वापर होत नाहीय. तरीसुद्धा एवढ्या मोठ्याप्रमाणात बिल कसं आलं याबद्दल राईस मीलच्या अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नाहीय.

नक्की वाचा >> इंधनदरवाढ हे केंद्र सरकारचं अपयश; मोदींचं ९ वर्षांपूर्वीचं ते ट्विट पुन्हा चर्चेत

वीज विभागाने दिलं स्पष्टीकरण…

दुसरीकडे ९० कोटींचं वीज बिल पाठवल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर वीज विभागामध्ये एकच गोंधळ उडालाय. या प्रकरणाची चर्चा सुरु झाल्यानंतर विभागाने स्वत:हून याची दखल घेत चौकशी केली असता सॉफ्टवेअरमधील गोंधळामुळे एवढं बिल आल्याची माहिती समोर आली. उप विभागीय अधिकारी रवि कुमार यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार सॉफ्टवेअरमधील गोंधळामुळे राईस मीलला एवढं बिल पाठवण्यात आलं.

या बिलासंदर्भात झालेला गोंधळ लवकरात लवकर दुरुस्त करुन नवीन बिल पाठवण्यात येईल असंही कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.