हरियाणामधील सोनीपत येथे पोलिसांकडून पेटीएमच्या माध्यमातून लाच घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरामधील तृतीयपंथीयांच्या मदतीने काही पोलीस कर्मचारी पैसे कमवण्यासाठी सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचे समजते. या प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सोनीपत येथे राहणाऱ्या विमल किशोर नावाच्या एका तरुणाने पोलिसांनी आपल्याकडे पेटीएमवरुन दोन हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ हिंदीने दिलं आहे.

दुचाकीवरुन घरी जात असताना हा सर्व प्रकार घडल्याचे विमालने म्हटले आहे. आपल्या मित्राला एका ठिकाणी सोडून विमल घरी जाण्याच्या मार्गावर अग्रसेन चौकात होता. त्यावेळी अचानक त्याच्या दुचाकीसमोर एक तृतीयपंथी व्यक्ती आला. त्याने विमलला काळजी घेऊन रस्ता ओलांड असा सल्ला दिला. तो तृतीयपंथी काय सांगतोय हे विमल ऐकत असतानाच एक पोलीस कर्मचारी तिथे आला आणि विमलला मारहाण करु लागला. विमलने या तृतीयपंथीशी छेडछाड केल्याचा आरोप करत पोलीस त्याला मारत होते. पोलिसांनी विमलला रस्त्याच्याकडेला फुटपाथवर नेलं. “तिथे अगदी जमीनीवर पाडून मला मारहाण केली,” असा आरोप विमलने केला आहे. विमलने आपण निर्दोष असून काहीच केलेलं नाही असं सांगितले. तसेच मला जाऊ द्या अशी विनंती विमल करत होता. त्यावेळी पोलिसाने त्याच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. विमलने माझ्याकडे कॅश नाहीय असं सांगितलं तेव्हा पोलिसाने फोन नंबर देत पैसे पेटीएम करण्यास सांगितल्याचा आरोप विमलने केला आहे.

पोलिसाच्या सांगण्यानुसार मी आधी १८०० आणि नंतर २०० रुपये पेटीएमच्या माध्यमातून पोलिसांनी दिलेल्या क्रमांकावर पाठवल्याचे विमाल सांगतो. पेटीएमवर पैसे मिळाल्याचा मेसेज आल्यानंतर पोलिसाने विमलला जाऊ दिले. सेक्टर १४ जवळ तैनात अशणाऱ्या पोलिसांना आपण घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितल्याचेही विमल म्हणाला. नंतर सेक्टर १२ मध्ये विमलने रितसर तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) रविंद्र कुमार यांनी पोलिसांनी लाच घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) रणबीर यांनी दोन हजार रुपये लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये रणबीर आणि त्या ठिकाणी असणारे दोन एसपीओ म्हणजेच स्टेशन पोलीस ऑफिसरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अहवाल लवकरच सोनीपतच्या एसपींना दिला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.