हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय महिलेला तिच्या पतीने तब्बल दीड वर्षांपासून शौचालयात कोंडून ठेवले होते. पानिपत जिल्ह्यातील रीशपूर गावामध्ये ही महिला राहते. या महिलेची सुटका केली, तेव्हा तिची अत्यंत वाईट अवस्था होती. पीडित महिला तीन मुलांची आई आहे. जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाच्या पथकाने बुधवारी एका अत्यंत छोटयाशा शौचालयातून या महिलेची सुटका केली.
सुटका केल्यानंतर सर्वातआधी महिलेला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर चुलतभावाकडे या महिलेला सोपवण्यात आले. नवऱ्याने महिलेला बंधक बनवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर, जिल्हा महिला संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाल्या. घरात शोध सुरु केल्यानंतर शौचालयामध्ये महिला बंद असल्याचे त्यांना समजले.
शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा, महिला तिथे खाली निपचित पडलेली होती. तिची अत्यंत वाईट अवस्था होती, असे रजनी गुप्ता यांनी सांगितले. चौकशीमध्ये मागच्या दीडवर्षांपासून महिलेला अशाच पद्धतीची अमानवीय वागणूक मिळत असल्याचे समोर आले.
पीडित महिला इतकी अशक्त झाली होती की, ती चार पावलेही चालू शकत नव्हती. आम्ही तिला जेवण दिले, तेव्हा तिने आठ चपात्या खाल्ल्या असे गुप्ता यांनी सांगितले. बंधक बनविल्यानंतर त्या महिलेला अन्न-पाणी व्यवस्थित दिले जात नव्हते असे गुप्ता म्हणाल्या. या महिलेच्या लग्नाला १७ वर्ष झाली. तिला तीन मुले आहेत. एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत.
पीडित महिलेच्या पतीने तिला मानसिक आजार असल्याचे सांगितले. पण महिला तिच्या सर्व कुटुंबीयांना ओळखते व विचारलेल्या प्रश्नांना सुद्धा तिने योग्य उत्तरे दिली, असे रजनी गुप्ता म्हणाल्या. विविध कलमांतर्गत महिलेच्या पती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 11:57 am