गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

भारताच्या हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही, असे घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

चिदंबरम यांनी केंद्र सरकारला दहा प्रश्न विचारले आहेत. जर चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली नसेल, तर ५ व ६ जून रोजी संघर्ष का झाला? ५ मे ते ६ जून या काळत भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये कोणत्या मुद्दय़ांवर चर्चा केली जात होती? ६ जून रोजी लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान कोणती बोलणी झाली? १५ व १६ जून रोजी झालेल्या संघर्षांच्या वेळी चिनी सैनिक भारताच्या हद्दीत आले होते का आणि संघर्ष नेमका कुठे घडला?  २० जवान कुठे शहीद झाले आणि ८५ जवान कुठे जखमी झाले? जर चीनने घुसखोरी केली नसेल तर विदेश मंत्र्यांनी ‘जैसे थे परिस्थिती’ कायम राहिली पाहिजे, असे निवेदन का केले? पूर्वीची परिस्थिती कायम ठेवली पाहिजे, याचा नेमका अर्थ काय? मागे हटण्याची प्रक्रिया केली जात आहे असे सरकारने म्हटले होते, त्याचा अर्थ काय? चिनी सैनिकांनी घुसखोरी केली नसेल तर २० जवानांना शहीद का व्हावे लागले? संघर्षांला भारत जबाबदार असल्याचा आरोप चीनने केला असून संपूर्ण गलवान खोरे चीनचे असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावर केंद्र सरकारचे उत्तर काय?  हा दावा केंद्र सरकारने फेटाळला आहे का? जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले होते. असे निवेदन देताना त्यांच्या मनात नेमके काय होते?  बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी केंद्र सरकार नेमके काय करणार आहे? असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.

स्पष्टीकरणावरही सवाल

पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनावरही काँग्रेसने सवाल केले आहेत. गलवान खोरे चीनचेच असल्याचा दावा चीनने केला असला तरी त्याचा उल्लेख पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात का नाही? गलवान खोरे भारताच्या हद्दीत आहे की नाही?  गलवान खोऱ्यात चिनी सैनिक असतील, तर ती घुसखोरी नव्हे का? पँगगाँग त्सो भूभागातील घुसखोरीबद्दल केंद्र सरकार गप्प का? १५ जून रोजी चिनी सैनिकांचे मनसुबे उधळून लावले गेले, असे पंतप्रधान म्हणाले. याचा अर्थ घुसखोरी झाली असा होत नाही का? ५ मे ते १५ जून या काळात झालेल्या घुसखोरीबद्दल केंद्र सरकारचे काय म्हणणे आहे? मागे हटण्याची प्रक्रिया, जैसे थे परिस्थिती असे शब्दप्रयोग  का केले गेले? अशा अनेक मुद्दय़ांवर पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात कोणताही उल्लेख नाही, असा आक्षेप काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी घेतला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांवर चीनमध्ये कारवाई?

बीजिंग : चिनी लोकांबाबत समाजमाध्यमांवर कथितरीत्या आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याबद्दल एका भारतीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची धमकी चीनमधील एका विद्यापीठाने दिली असल्याचे वृत्त एका सरकारी प्रसारमाध्यमाने शनिवारी दिले. कदुक्कासेरी या आडनावाचा हा भारतीय विद्यार्थी पूर्व चीनच्या जिआंग्सु प्रांतातील जिआंग्सु विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांने नंतर दिलगिरी व्यक्त केल्याचेही त्यात नमूद केले आहे.