आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकारपरिषद घेऊन याबाबत घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशाची विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषेदत निडवणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार २७ मार्च ते २९ एप्रिल पर्यंत मतदान होणार असून, सर्व राज्यांमधील निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. तर, या पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चा असलेली व अवघ्या देशाचे लक्ष लागलेली पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त करत, निवडणूक आयोगालाच सवाल केला आहे.

“मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आदर करते, मात्र जिल्ह्यांची तोडफोड का केली गेली? दक्षिण २४ परगाना हा आमचा गड आहे. तिथं तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. हे मोदी व शाह यांच्या सोयीनुसार केलं गेलं आहे का?” असा सवाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

Assembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला निकाल

तसेच, “मी निवडणूक आयोगाला विनंती करते की पश्चिम बंगालला त्यांनी स्वतःचं राज्य समाजावं, भाजपाच्या नजेरतून पाहू नये. केंद्रीयमंत्र्याने देशासाठी काम करायला हवं. ते इथल्या निवडणुकीसाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू शकत नाहीत. आम्ही पंतप्रधानांचे स्वागत करतो, पण पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ते आपल्या अधिकारांचा गैरवापर करू शकत नाहीत.” असं देखील ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं.

“राज्याच्या निवडणुकीसाठी केंद्र आपल्या अधिकारांचा गैरवापर करु शकत नाही. जर त्यांनी असं केलं, तर ती मोठी चूक असेल आणि त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही सामान्य नागरीक आहोत, आम्ही आमची लढाई लढू. निवडणूक आयोगाला विनंती आहे की पैशांचा दुरुपयोग थांबवावा. भाजपाने सर्व जिल्ह्यांमध्ये एजन्सीजमार्फत पैसे पाठवले आहेत.” असा गंभीर आरोप देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी यावेळी भाजपावर केला.

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा टप्पा – १ एप्रिल, तिसरा टप्पा- ६ एप्रिल, चौथा टप्पा – १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा – २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात पार पडणार विधानसभा निवडणूक

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक भाजपा व तृणमूल काँग्रेसकडून प्रतिष्ठेची करण्यात आल्याचे दिसत आहे. कारण, आतापर्यंत राज्यातील सभा व अन्य कार्यक्रमांमधून या दोन्ही पक्षांमधील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे. शिवाय, अनेकदा नेत्यांवर हल्ल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.

पाच राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे. पाच राज्यात २.७ लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, १८.६ कोटी मतदार आहेत. या सर्व राज्यांध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.