क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने अलिपोर कोर्टामध्ये शमीविरोधात खटला दाखल केला असून स्वत:च्या व मुलीच्या पालनपोषणासाठी शमीकडून दरमहा 10 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे. ही तक्रार दाखल करून घेत कोर्टाने शमी व अन्य संबंधितांना नोटीस बजावली असून 15 दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडायचे निर्देश दिले आहेत.

या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी आम्ही कोर्टाची पायरी चढलो असल्याचे झाकीर हुसेन या हसीन जहाँच्या वकिलानं सांगितलं आहे. समन्स मिळाल्यानंतर 15 दिवसांमध्ये कोर्टात हजर व्हावं आणि आपली बाजू मांडावी असं त्यांना कोर्टानं सांगितल्याचं हुसेन म्हणाले. पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे.

मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता हसीन जहाँ कोर्टात आली आणि तिने शमीविरोधात तक्रार दाखल केली. मोहम्मद शमी, त्याची आई अंजुमन आरा बेगम, त्याची बहिण सबिना अंजुम, त्याचा भाऊ मोहम्मद हसीब अहमद आणि हसीबची पत्नी शमा परवीन यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
जाधवपूर पोलिस ठाण्यात 8 मार्च रोजी केलेल्या तक्रारीत याच सगळ्यांची नावं होती. पोलिसांनी विविध कलमांतर्गत या तक्रारीची चौकशीही सुरू केली होती. पोलिसांनी शमीच्या गावाला भेट देत शेजाऱ्यांच्या व नातेवाईकांच्या जबान्याही घेतल्या असून अद्याप शमीची जबानी घेतलेली नाही.

तिने हा मुद्दा उपस्थित केल्यापासून शमीनं पत्नीला एक रुपयाही दिला नसल्याचे तिच्या वकिलानं सांगितलं असून त्यानं दिलेला एक लाख रुपयाचा चेक परत आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा खटला वेगळा असून तो पोटगीसाठी असल्याचे वकिलांनी स्पष्ट केले. दर महिन्याचा खर्च भागवण्यासाठी हसीन जहाँकडे पैसे नसल्यामुळे दरमहा 10 लाख रुपये मिळावेत अशी तिची मागणी असल्याचे हुसेन यांनी सांगितले.