भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसिन जहाँ हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी हसिन जहाँ हिचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. मोहम्मद शमीवर अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आणि मारहाण केल्याच्या आरोपांमुळे हसिन जहाँ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आली होती.


 
मोहम्मद शमी आणि हसीनच्या संसारामधील वाद या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वांसमोर आले होते. ज्यानंतर या दोघांमध्येही आरोप- प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळालं होतं. हसीन जहाँने शमी विरोधात कोलकाता येथील अलीपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हसीन जहाँ वादामुळे शमीला मध्यंतरी भारतीय संघातून वगळण्यातही आले होते. त्यानंतर शमीने मोठ्या जिद्दीने संघामध्ये पुनरागमन केले आहे.

मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप शमीच्या पत्नीनं केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. शमीची पत्नी हसिन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केले होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता. या पोस्टमध्ये हसिनने काही मुलींचे फोटो, मोहम्मदबरोबर त्यांनी केलेलं अश्लिल संभाषण, या मुलींचे फोन नंबरही प्रसिद्ध केले होते. या फेसबुक पोस्टनंतर मोठी खळबळ उडाली होती.