इराणचे अध्यक्ष हसन रौहानी पहिल्यांदाच पाकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर येत असून तेव्हा तीन हजार मेगावॅट विजेची आयात आणि गॅस पाइपलाइन उभारण्यासह दोन्ही देशांमध्ये अनेक वाणिज्यिक करार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रौहानी यांच्या भेटीबाबत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानातील इराणचे राजदूत मेहदी होनारदूस्त यांच्याशी सविस्तर चर्चा केली. येत्या २५ आणि २६ मार्च रोजी रौहानी पाकिस्तान दौऱ्यावर येत असून त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास आसिफ यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक व्यापक करण्याबाबत रौहानी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करणार आहेत. तेलसमृद्ध इराण पाकिस्तानला पेट्रोलजन्य उत्पादने, वीज विकण्यास इच्छुक असून पाकिस्तानमध्ये गॅसपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्यास इच्छुक आहे.
या भेटीत तीन हजार मेगाव्ॉट विजेची आयात करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.