जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने जी घाई केली त्याचमुळे देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. हिमाचल प्रदेशातील मंडी या ठिकाणी झालेल्या ‘विकाससे विजय की ओर’ या रॅलीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बोलत होते. देशात इतर अनेक प्रश्न आहेत मात्र केंद्र सरकारने कर रचनेत बदल करून घाईघाईने जीएसटी आणला यामुळे एकट्या गुजरातमध्ये ३० लाख तरूणांनी नोकऱ्या गमावल्या असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

आपल्या देशात बेरोजगारी ही मुख्य समस्या आहे. या समस्येशी तोंड देणे ही केंद्राची जबाबदारी आहे. देशात रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र गुजरातमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तशीच काहीशी परिस्थिती देशभरातही झाली आहे. अनेक तरूणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, त्याचमुळे अनेक तरूणांना त्यांची नोकरी गमवावी लागली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विकाससे विजयकी ओर ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर भाजप सरकारने साडेतीन वर्षांच्या कालावधीत देशाला आश्वासनांशिवाय काय दिले? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे लक्ष द्यायला सरकारकडे आता अवघे दीड वर्ष उरले आहे. या कालवाधीत जर सरकारने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध केल्या नाहीत आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर जनता लोकसभा निवडणुकांच्या वेळी मतपेटीतून त्यांचा राग नक्कीच व्यक्त करेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले.