वर्णद्वेषातून विस्कॉन्सिन येथील ओक क्रीक गुरुद्वारावर गोळीबार करून सहा भाविकांची हत्या केल्याच्या घटनेला येत्या ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष होत आहे. या कटू आठवणींना उजाळा देत वर्णद्वेषातून झालेल्या या हत्याकांडातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या शुक्रवारपासून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ऑगस्ट २०१२ रोजी एका माथेफिरूने वर्णद्वेषातून विस्कॉन्सिन येथील गुरुद्वारावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चार दिवस आधीपासूनच शोकसभा, प्रार्थनासभा, मेणबत्ती मोर्चा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑगस्ट रोजी सकाळपासून अखंड पाठाचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी मिलवाऊकी येथील यूए फेडरल कोर्ट हाऊसमध्ये त्या हल्ल्यात बळी गेलेल्या सहा जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित राहणार आहेत. तर गुरुद्वाराच्या वतीने कीर्तनाचे आयोजनही करण्यात येणार आहे.

गुरुद्वाराच्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण
कॅलिफोर्नियातील एका गुरुद्वाराची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून भिंतींवर द्वेषभावनेतून ‘दहशतवादी’ लिहिल्याचे उघडकीस आले आहे. ओक क्रीक गुरुद्वारावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा द्वेषभावनेतून भारतीयांना लक्ष केल्यामुळे येथील शीख समाजात नाराजीची पसरली आहे. २९ जुलैच्या रात्री समाजकंटकानी गुरुद्वाराची तोडफोड करून भिंतींवर ‘दहशतवादी’ असे लिहिल्याची माहिती शीख अमेरिकन लीगल डिफेन्स अ‍ॅण्ड एज्युकेशन फंड (एसएएलडीईएफ)चे संचालक जसजित सिंग यांनी दिली.