हाथरस सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणावरुन उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे संताप व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमधील शाब्दिक वादही शिगेला पोहोचला आहे. विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीका होत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी यांनी शनिवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यापूर्वी राहुल आणि प्रियंका यांनी हाथरसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आडवण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीमध्ये राहुल गांधी हे रस्त्यावर पडल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. यावरुनच भाजपाच्या समर्थकांना राहुल गांधी हे नाटक करत असल्याची टीका सुरु केली होती. मात्र आता जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि सीपीआय नेते कन्हैय्या कुमार यांनी मागील आठवड्यामधील तीन घटनांची एकत्र सांगड घालत प्रंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
मागील आठवड्यामध्ये बाबरी मशीद प्रकरणामध्ये सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आल्याचा निर्णय देण्यात आला. त्यावरुन मशीद स्वत:च पडली. अर्थव्यवस्थेची पडझड होत आहे. राहुल यांच्या फोटोवर विरोधी पक्षाचे नेते कॅमेरा पाहून पडतात अशी टीका भाजपा समर्थकांनी केली. तसेच मागील आठवड्यामध्ये पंतप्रधानांबरोबर विशेष व्यक्तींच्या प्रवासासाठी ८ हजार कोटींहून अधिक किंमतीचे विमान दाखल झाले. या सर्व गोष्टींचा एकाच ट्विटमध्ये संदर्भत देत एवढं सर्व काही पडत असताना पंतप्रधांनी स्वत:ला उडण्यासाठी ८ हजार कोटींचा विमान घेतलं आहे असं टोला कन्हैया यांनी लगावला आहे.
“मशीद आपोआप पडली, जीडीपी स्वत:च पडत आहे, विरोधी पक्षातील नेते कॅमेरा बघून पडत आहेत. केवळ प्रधान-सेवक वर उठताना दिसत आहेत. त्यांनी उडण्यासाठी ८ हजार कोटींच्या विमानाची व्यवस्था केली आहे,” असं ट्विट कन्हैया यांनी केलं आहे.
मस्जिद अपने आप गिरी, जीडीपी अपने आप गिर रही, विपक्ष के नेता कैमरा देख कर गिर रहे। ऊपर तो बस एक प्रधान-सेवक उठे हैं, जिन्होंने अपने उड़ने के लिए 8 हज़ार करोड़ के विमान का इंतज़ाम किया है।
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) October 3, 2020
दरम्यान, हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही मागणी केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांना वाईट वागणूक दिली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्न सरकारमधील कोण करीत आहे, याचा खुलासा झाला पाहिजे, असंही प्रियंका म्हणाल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 7:32 am