उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाला व त्या पीडितेचा मृत्यू झाल्याने, सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी टिप्पणी करत, मायावती हाथरस प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

“महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा.” अशी मागणी मायावतींनी केली होती. यावरून केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

“हाथरस मधील घटना हा मानवतेवर कलंक आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितेच्या कुटुंबास न्याय दिला पाहिजे. या मुद्यावरून मायावती राजकारण खेळत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही.” असं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

तर, मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत, “माझा १०० टक्के विश्वास आहे की सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं.” असं म्हटलं होतं. तसेच, “योगीजी तुम्ही देखील एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्ही महिलांचे संरक्षण करू शकत नसाल तर तुम्ही पदावरूवन स्वतःच दूर व्हायला हवं, तुम्ही स्वतःच राजीनामा द्यायला हवा.” असं देखील मायवती म्हणाल्या होत्या.