News Flash

हाथरस : “मुलगी करोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा नसती मिळाली”; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य

जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा व्हिडिओ व्हायरल

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना नको त्या पद्धतीने धमकी देणारे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार हे अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या वहिनीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना तुमची मुलगी करोनाने मेली असती तर तुम्हाला नुकसानभरपाई  मिळाली असती का?, असा प्रश्न विचारल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. यासंदर्भातील वृत्त आजतकने दिलं आहे.

“अर्धी मीडिया आज गेली आहे, उरलेले उद्यापर्यंत गेलेले तुम्हाला दिसतील. फक्त आम्हीच इथे तुमच्यासोबत आहोत. आता आपला जबाब बदलायचा का नाही याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे,” असं प्रवीण कुमार या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पीडितेची वहिनीचा धक्कादायक आरोप

पीडितेच्या वहिनीने या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेल्या वक्त्यांशिवाय जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आम्हाला करोनाने मुलीचा मृत्यू झाला असता तर नुकसानभरपाई मिळाली असती का? असा प्रश्न आम्हाला विचारल्याचा आरोप केला आहे. आम्हाला धमक्या देण्यात येत आहेत. माझ्या सासऱ्यांनाही धमक्या दिल्या जात आहे. ते अधिकारी आमच्याशी बोलताना परिस्थिती अशी होती की आमच्या मनात येईल ते आम्ही त्यांच्या होकारात होकार मिळवत म्हणत होतो. आता हे लोकं आम्हाला येथे राहू देणार नाही, अशी भीतीही पीडितेच्या वहिनीने व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> Hathras Case : “सफदरजंग रुग्णालयातील नंबर प्लेट नसलेल्या ‘त्या’ रुग्णवाहिकेचे रहस्य काय?”

या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार

इंडिया टुडेने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना यासंबंधी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. उत्तर प्रदेश पोलीस आणि हाथरस जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीने संपूर्ण घटना हाताळली आहे त्यावरुन देशभरात उद्रेक आहे. पोलिसांनी पीडितेच्या पार्थिवावर बळजबरी अंत्यसंस्कार केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ज्या व्यक्तीने अंत्यसंस्कार केले त्याचं नाव जाहीर करु शकत नाही असं सांगितलं आहे. ज्या रुग्णवाहिकेतून पार्थिव नेलं जात होतं तिला काही स्थानिक महिलांनी अडवलं होतं, तसंच अंत्यसंस्कार झाले तेव्हा पीडितेचा भाऊ तिथे उपस्थित होता असा दावा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केला आहे. पीडितेच्या वडिलांनी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला घराबाहेर जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप केला असून पोलिसांनी बळजबरीने जबाब घेत त्यावर स्वाक्षरी करुन घेतल्याचं म्हटलं आहे.

कुटुंबाला २५ लाखांची मदत

उत्तर प्रदेश सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीही देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटलं आहे. याचबरोबर कुटुंबासाठी एक घरही दिलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 10:54 am

Web Title: hathras dm said you would have not got compensation if your daughter had died of corona scsg 91
Next Stories
1 मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण
2 ५३ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची करोनावर मात; चोवीस तासांत ८१,४८४ नव्या रुग्णांची नोंद
3 Hathras Case : “सफदरजंग रुग्णालयातील नंबर प्लेट नसलेल्या ‘त्या’ रुग्णवाहिकेचे रहस्य काय?”
Just Now!
X