उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने गुरुवारी सरकारच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. न्या. राजन रॉय आणि जसप्रीत सिंग यांनी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव, उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना १२ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहून या प्रकरणासंदर्भातील माहिती देण्याचे आदेस दिले आहेत.

१४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्वतःहून याचिका (सु मोटो)  दाखल करुन घेतली. यावेळी न्यायालयाने हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनाही हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हाथरसमध्ये नक्की काय घडलं यासंदर्भात पोलिसांकडे असणारे सर्व पुरावे आणि कागदपत्र घेऊन अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हजर रहावे आणि यासंदर्भातील माहिती पुराव्यानिशी न्यायालयाला द्यावी असंही खंडपीठाने नोटीसमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- Hathras Case : “सफदरजंग रुग्णालयातील नंबर प्लेट नसलेल्या ‘त्या’ रुग्णवाहिकेचे रहस्य काय?”

पीडित तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीचा मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. तिचे पार्थिव घरी घेऊन जाण्याची कुटुंबीयांची मागणी धुडकावून पोलिसांनी मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या कारवाईमुळे आता पोलिसांना न्यायालयासमोर हे सर्व प्रकरण सविस्तरपणे मांडावे लागणार आहे.

आणखी वाचा- “मीडिया काही दिवसांनी निघून जाईल, आम्ही इथेच आहोत,” हाथरस पीडितेच्या वडिलांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांची धमकी

पीडितेचे पार्थिव घरी घेऊन जाण्याची कुटुंबीयांची मागणी धुडकावून पालकांची परवानगी न घेताच पोलिसांनी मध्यरात्री तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दिलेल्या तारखेपर्यंत झालेला तपास आणि इतर सर्व तपशील घेऊन अधिकाऱ्यांनी खंडपीठासमोर आपली बाजू मांडवी असं न्यायालयाने म्हटलं आहे. याचबरोबर न्यायालयाने पीडितेच्या पालाकांनाही यावेळी उपस्थित राहून नक्की काय घडलं याबद्दलची माहिती देण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. हाथरस जिल्हा प्रशासनाने पीडितेच्या पालाकांच्या प्रवसाची सोय करावी असं न्यायलायाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

आणखी वाचा- हाथरस : “मुलगी करोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा नसती मिळाली”; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य

बलात्कार झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा

हाथरस पीडित तरुणीवर बलात्कार झालेला नसल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा गुरुवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी केला. यामुळे देशभर पडसाद उमटत असलेल्या या प्रकरणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘‘गळ्याजवळ झालेली दुखापत आणि त्यामुळे झालेल्या मानसिक आघातामुळे हाथरसच्या पीडितेचा मृत्यू झाल्याचे  शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तसेच तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये शुक्राणू आढळले नसल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झालेला नसल्याचे स्पष्ट होते’’, असा दावा अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत बलात्काराचा उल्लेख केलेला नसून, केवळ मारहाण (मारपीट) झाल्याचे सांगितले, असे  प्रशांत कुमार म्हणाले.

आणखी वाचा- “हाथरस प्रकरणात DGP, जिल्हाधिकारी, SSP विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा”; भाजपा आमदाराची मागणी

सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न
सामाजिक सलोखा बिघडविण्याबरोबरच जातीय हिंसाचार घडविण्यासाठी काही जणांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलली असून, सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची ओळख पटविण्यात येत असल्याचे प्रशांत कुमार म्हणाले. हाथरस प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईलच. मात्र, वैद्यकीय अहवाल येण्याआधीच काहींनी सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्य़ांबाबत सरकार आणि पोलीस संवेदनशील असल्याचेही प्रशांत कुमार यांनी नमूद केले.