अहालाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर सोमवारी (१२ ऑक्टोबर २०२०) रोजी हाथरस प्रकरणाची सुनावणी सुरु झाली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अप्पर पोलीस महानिर्देशक, कायदा आणि सुव्यवस्था (एडीजी) प्रशांत कुमार यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केली. पीडितेच्या वकील सीमा कुशवाहा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना न्यायालयाने कुमार यांना काही प्रश्न विचारले. तुमच्या मुलीबरोबर असं काही झालं असतं आणि अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आले असते तर कसं वाटलं असतं, असा प्रश्न विचारल्याचा दावा सीमा कुशवाहा यांनी आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

न्यायालयामध्ये उपस्थित असणाऱ्या पीडितेच्या वकील असणाऱ्या सीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायाधिशांनी पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबियांकडे घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. न्या. पंकज मित्तल आणि न्या. राजन रॉय यांच्या खंडपीठाने पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असा शब्द दिला. सीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले ज्याची उत्तर अधिकाऱ्यांना देता आली नाही. या प्रकरणातील पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सुनावणीदरम्यान हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार ळक्षकार यांनी न्यायालयासमोर कथित बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेच्या मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. यासाठी जिल्हा प्रशासनावर उत्तर प्रदेश सरकारने कोणताही दबाव आणला नव्हता असं स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या वतीने अप्पर महाधिवक्ता व्ही. के. साही सुद्धा न्यायालयामध्ये उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कोणावर आहे असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

न्या. पंकज मित्तल आणि न्या. राजन रॉय यांच्या खंडपिठाने दुपारनंतर पीडितेचे कुटुंबिय न्यायालयामध्ये पोहचल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरु केली. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलीस महानिर्देशक, अप्पर पोलीस महानिर्देशक, कायदा सुव्यवस्था (एडीजी) प्रशांत कुमार यांच्याबरोबर हाथरसचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकही न्यायालयामध्ये उपस्थित होते. पीडितेचे आई-वडील यांच्याबरोबरच इतर पाच नातेवाईक सुरक्षा रक्षकांच्या कड्यातच न्यायालयामध्ये पोहचले. पहाटे सहा वाजताच नातेवाईक पोलिसांसहीत लखनऊला येण्यासाठी रवाना झाले. दुपारच्या सुमारात ते न्यायालयामध्ये पोहचले.

१४ सप्टेंबर रोजी हाथरस जिल्ह्यामध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर उच्च जातीच्या चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला अलीगडच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर या मुलीला सफदरजंग रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान २९ सप्टेंबर रोजी या तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये एक ऑक्टोबर रोजी लखनऊ उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन उत्तर प्रदेश सरकारच्या गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भातील स्पष्टीकरण देण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.