हाथरस प्रकरणावर संताप व्यक्त करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चारही आरोपींना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे. देशभरात गाजत असलेल्या हाथरस सामूहिक अत्याचारातील पीडितेच्या कुटुंबीयांची रामदास आठवले भेट घेणार आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचीही आठवले भेट घेणार आहेत.

हाथरस प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली जात असून, या प्रकरणी रामदास आठवले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. रामदास आठवले यांनी यापूर्वीच या भेटीची माहिती दिली होती. आज एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना आठवले म्हणाले,”मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उद्या लखनऊमध्ये भेट घेणार आहे. त्यांच्यासोबत हाथरस घटनेवर चर्चा करणार आहे. चारही आरोपींना फासावर लटकवायला हवं,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

आणखी वाचा- “आजपर्यंत देशातील जनतेने कधीही…”; हाथरस प्रकरणावरुन शरद पवारांनी योगी सरकारला सुनावलं

आणखी वाचा- “त्यांना अशी शिक्षा केली जाईल की…”; हाथरस प्रकरणानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

“आठवले राष्ट्रपतींकडे जाणार का?”

हाथरस प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्यावरही टीका केली होती. हाथरस प्रकरणावरून प्रचंड असंतोष उफाळून आलेला असताना आठवले अभिनेत्री पायल घोष हिच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. त्यावर शिवसेनेनं सवाल उपस्थित केला होता. “कंगनाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना जबाबदार धरणारे, घरी जाऊन तिला भेटणारे. पायल घोषला राज्यपालांकडे घेऊन जाणारे रामदास आठवले आता युपीच्या हाथरसमधील मृत्यू पावलेल्या दलित पीडित मुलीच्या नातेवाईकांना घेऊन योगी सरकारविरुद्ध राष्ट्रपतींकडे न्याय मागण्यासाठी जातील का?,” असं शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.