गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडवून दिली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष सध्या हाथरसमधील घटनाघडामोडींकडं लागलं आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला विरोधकांनी घेरलं असून, सोशल मीडियातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या मुलांच्या वडिलांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

हाथरसमधील सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं. यातील एका आरोपीच्या वडिलांनी मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. ‘न्यूज १८’नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अटक करण्यात आलेल्या रामू नावाच्या आरोपीच्या वडिलांनी हा दावा केला आहे. त्याचबरोबर खासदार राजवीर दिलेर आणि त्यांच्या मुलीनं फसवल्याचा आरोपही केला आहे. पीडित तरुणीनी वाल्मिकी समुदायातील असून, खासदारही याच समुहातून येतात. तर आरोपी ठाकूर समुदायातील आहेत. त्यामुळे मुलाला फसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“माझा मुलगा दोषी असेल, तर त्याला सगळ्यांसमोर गोळ्या घाला. या घटनेत निर्दोष लोकांना फसवण्यात आलं आहे. आम्ही ठाकूर समुदायातील आहोत. रवि त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. तर संदीप सगळ्यात मोठ्या भावाचा नातू आहे. सगळं निर्दोष आहेत. आम्ही त्यांचे शेजारी आहोत. ही घटना १४ सप्टेंबर घडली आहे. आधी फक्त संदीपचं नाव होतं. मात्र, त्यानंतर राजवीर दिलेर यांच्या मुलीनं यात हस्तक्षेप केल्यानंतर आरोपींची नावं वाढवण्यात आली,” असा दावा आरोपी रामूच्या वडिलांनी केला आहे.

“हाथरसला बदनाम केलं जातंय”

“हे प्रकरण मारहाणीचं आहे. जर चार मुलांवर गुन्हा दाखल झाला असता, तर त्यांची कोणतीही तक्रार नव्हती. पण, या सामूहिक बलात्काराच्या आरोपांबरोबरच युवकांना अटक केल्यानं लोकांमध्ये रागाची भावना आहे. या मतदारसंघातील लोकांशी चर्चा झाली आहे. ज्यांना जनाधार नाही, तेच लोक आंदोलन करत आहेत. सरकारला विनाकारण बदनाम केलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला असं वळणं दिलं गेलं की, हाथरस देशभरात बदनाम व्हावं. आम्हाला एसआयटीच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे. सत्य समोर येईलच,” असा विश्वास माजी आमदार राजवीर सिंह पहेलवान यांनी व्यक्त केला आहे.