उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचे अजूनही पडसाद उमटत आहे. पीडितेला न्याय देण्याची मागणी जोर धरत असून, पीडितेच्या कुटुंबीयांची विविध पक्षांसह संघटनांच्या प्रतिनिधींकडून भेट घेतली जात आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेख आझाद यांनी आज हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या.

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडवून दिली. संपूर्ण देशाचं लक्ष सध्या हाथरसमधील घटनाघडामोडींकडं लागलं आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला विरोधकांनी घेरलं आहे. , सोशल मीडियातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रचंड विरोधानंतर काल पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांचं भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी आझाद यांनी सरकारकडे काही मागण्यांही केल्या आहेत.

भेटीनंतर बोलताना आझाद म्हणाले,”पीडितेच्या कुटुंबीयांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. अन्यथा आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ. ते इथे सुरक्षित नाहीत. या घटनेचा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशांच्या निगराणीखाली चौकशी करण्यात यावी,” अशी मागणीही चंद्रशेखर यांनी केली.

हाथरसच्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यावर उत्तर प्रदेश सरकारकडून विरोध करण्यात आला होता. मात्र, हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांनी भेट घेऊन सांत्वन केलं होतं.