हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारला सवाल केले जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानंही सरकारवर टीका होत असून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी योगी सरकारला सल्ला दिला आहे.

बसपाच्या नेत्या मायावती यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. “हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहितीची घेण्यासाठी तिथे २८ सप्टेंबर रोजी सगळ्यात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र, पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास मजबूर केलं,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.

“त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार.. हे सगळं अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील,” असा सल्ला मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

हाथरस प्रकरणाचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, सरकारकडून त्याला विरोध केला जात आहे. राजकीय नेत्यांवर लाठीमार केल्याचे प्रकार घडले. विशेष म्हणजे माध्यमांना भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं.