उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सफदरगंज रुग्णालयाबाहेर आंदोलनेही करण्यात आली. हे प्रकरण २०१२ साली घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणासारखे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची दाहकता ही दिल्ली बलात्कार प्रकरणाइतकीच असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अगदी सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकींनी या घटनेतील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

नक्की काय घडलं?

१४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एका फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

आणखी वाचा- Hathras Gangrape: युपी पोलिसांकडून जबरदस्ती करण्यात आले पीडितेवर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा दावा

मृत्यूनंतर आंदोलन

या पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार त्याची बहिणी गंभीररित्या जखमी झालेली असतनाही सारखं घरी जाण्यासंदर्भात बोलत होती. या प्रकरणी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीची भेट घेतली होती. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील याप्रकरणी योगी सरकारवर निशाणा साधला होता. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर केली. या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी रुग्णालयासमोर अनेक तास निदर्शने केली. यावेळी त्यांनी बलात्काऱ्यांना फासावर लटकवा अशी मागणी केली. यानंतर आझाद यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच सफदरगंज रुग्णालयाबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली. या प्रकरणातील चारही आरोपी हे उच्च जातीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा- मोदींनी घेतली हाथरस सामूहिक बलात्काराची दखल, योगींना फोन करुन दिला आदेश; म्हणाले…

शेतात खेचून घेऊन गेले

दिल्लीपासून २०० किमी अंतरावर असणाऱ्या हाथसर जिल्ह्यातील गावामध्ये १४ सप्टेंबर रोजी या पीडित तरुणीवर नराधमांनी बलात्कार केला. मी माझ्या आई आणि भावाबरोबर शेतामध्ये गवत कापण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपींनी ओढणीच्या सहाय्याने मला खेचत नेलं असं या पीडित तरुणीने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं होतं. “माझी आई, बहीण आणि मोठा भाऊ गुरांना चारा आणण्यासाठी शेतामध्ये गेले होते. गवत कापून झाल्यावर गवताचा मोठा भारा घेऊन माझा भाऊ परतला. त्यावेळी शेतामध्ये माझी बहीण आणि आई गवत कापत होते. तेव्हा चार ते पाच जण दुसऱ्या शेतामधून आले आणि माझ्या बहिणीच्या गळ्याभोवती ओढणी टाकून तिला खेचून शेजारच्या बाजरीच्या शेतात घेऊन गेले,” असं पीडितेच्या भावाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

आणखी वाचा- Hathras Gangrape: यूपी सरकारकडून तपासासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

पोलिसांकडे गेले तेव्हा…

या कुटुंबाने मुलीचा शोध घेतला असता ती शेतामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. मुलीच्या अंगावर असंख्य जखमा होत्या. “माझ्या आईने तिचे शरीर कापडाने झाकलं. आम्ही तिला पोलीस स्थानकात घेऊन गेलो. तिथे तिला पोलिसांसमोर ठेवत आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तिची मानेजवळी तीन हाडं तुटली होती. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरुवातीपासूनच ऑक्सिजन मास्क लावण्यात आलं होतं. तिच्यावर बलात्कार झाला होता. पोलिसांनी आम्हाला सुरुवातीला काहीच मदत केली नाही. त्यांनी काहीच कारवाई केली नाही. चार पाच दिवसानंतर त्यांनी कारवाई केली,” असं पीडितेच्या भावाने सांगितलं आहे. या प्रकरणानंतर उत्तर प्रदेश पोलिसांवर चहूबाजूने टीका होताना दिसत आहे.  पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतरच त्यांनी आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.