हाथरसची घटना भाजपाशासित राज्यात घडली आहे. मग ते कुठल्या हिंदू संस्कृतीबाबत बोलत आहेत? असा सवाल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. ट्विटद्वारे त्यांनी भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांना टोला लगावला आहे. “चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात त्यासाठी पालकांनी मुलींवर चांगले संस्कार करावेत अस विधान सुरेंद्र सिंह यांनी केलं होतं.”

भाजपा आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते, “मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र, मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे.”

सुरेंद्र सिंह यांना सुनावताना गेहलोत यांनी सलग तीन ट्विट केले. यात ते म्हणतात, “हाथरसमध्ये रात्री २ वाजता मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा निष्काळजीपणा ह्रदयद्रावक असून संपूर्ण देशाच्या स्मृतीपटलावर कायमस्वरुपी ही घटना छापली जाणार आहे. रात्री पोलिसांच्या देखरेखीखाली आपण अत्यंसंस्कार करावेत आणि मुलीच्या आईनं तिला शेवटचं पाहण्यासाठी सैरभैर व्हावं.”

“करोनाच्या काळातही अंत्यसंस्कारावेळी कुटुंबातील २० लोकांना सूट देण्यात आली आहे. विना करोनाबाधित मृतदेहाला अंत्यसंस्कारांसाठी कुटुंबियांकडे सोपवण्यात येतं. सीमेवर शहीद जवानांचे पार्थिवही हेलिकॉप्टर, विमान, परदेशातून पहिल्यांदा त्यांच्या गावी पाठवले जातात. अशा प्रकारे सन्मान देण्याची पद्धत आपल्या देशाचे संस्कार, संस्कृती आणि धार्मिक परंपरांनुसार कायम आहे. मात्र, हे सर्व भाजपाशासित राज्यात घडलं आहे. मग भाजपा कुठल्या हिंदू संस्कृतीबाबत सांगत आहे?” असा सवाल राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.