News Flash

हाथरस : पीडितेची आई म्हणाली,”अधिकारी म्हणत होते खात्यात किती पैसे आले माहित आहे का?”

शवविच्छेदनात काय होतं माहित आहे का? असाही सवाल केल्याची पीडितेच्या कुटुंबीयांची माहिती

(फोटो सौजन्य: पीटीआय)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पीडितेच्या आईनंदेखील आपली व्यथा मांडली आहे. “शेवटीदेखील आम्हाला आमच्या मुलीचा चेहरादेखील पाहू दिला नाही,” असं पीडितेच्या आईनं सांगितलं. तसंच एका अधिकाऱ्यानं तुमच्या खात्यात किती पैसे आले हे तुम्हाला माहित आहे का? असंही म्हटल्याचं त्यांनी सांगितलं.

“एसआयटीची टीम आणि दुसरे अधिकारी आपल्या घरी आले होते तेव्हा ते बोलत होते. तुम्हाला पैसे मिळणार आहेत… अरे तुम्हाला पैसे मिळणार आहे… तुम्हाला माहित नाही तुमच्या खात्यात किती पैसे आले?,” असं त्यावेळी अधिकारी म्हणत असल्याचं पीडितेच्या आईनं सांगितलं. आजतक या वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी आपली व्यथा मांडली. दरम्यान, आपल्या खातात किती पैसे आले हे माहित नाही. परंतु आपल्याला न्याय पाहिजे असंही त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्या अन्य कुटुंबीयांनीदेखील संवाद साधला. “या प्रकरणी कोणाला हटवण्यात आलं याची माहिती आपल्याला नाही. आपल्याला या प्रकरणी सीबीआयकडूनही तपास नको. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांमार्फत झाला पाहिजे. त्यांच्य़ा अध्यक्षतेखाली तपास झाला पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.

आणखी वाचा- पोलीस महासंचालक घेणार हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट; हायकोर्टानं फटकारल्यानंतर धावाधाव

यावेळी त्यांना १४ सप्टेंबर रोजी दिलेल्या जबाबाबाबत सवाल करण्यात आला. “त्या दिवशी आम्ही दोघीही घाबरलो होतो. माझी मुलगीही घाबरली होती. या ठिकाणाहून तिला लवकर घेऊन जा असं लोकं सांगत होते. ज्यावेळी माहिती मिळाली त्यावेळी त्या ठिकाणी तपास करण्यात आला,” असं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी नार्को टेस्टवरही भाष्य केलं. ही चाचणी काय असते हे आपल्याला ठाऊक नाही. आपण नार्को टेस्ट करणार नसल्याचंही तिच्या आईनं सांगितलं.

आणखी वाचा- हाथरस पीडितेच्या गावात ३०० पोलिसांची फौज, दोन दिवस कुटुंबाला केलं ‘कैद’; फोन टॅपिंगचा संशय

यावेळी पीडित मुलीच्या वहिनेनंदेखील अनेक गौप्यस्फोट केले. एसआयटीची टीम दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी आली होती आणि त्यांनी चौकशीदेखील केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच जिल्ह्याच्या डीएम यांनी अयोग्यरित्या संवाद साधल्याचंही त्या म्हणाल्या. आम्हाला न्याय मिळावा ही एकच आमची मागणी आहे. अखेरच्या क्षणी आपल्या लहान मुलीचा आपल्याला चेहराही पाहता आला नाही की तिच्यावर अंत्यसंस्कारही करता आले नाही. त्या रात्री तिच्यावरच अंतिम संस्कार केले का नाही हेदेखील माहित नाही. त्या रात्री पोलिसांनी कोणांचं पार्थिव जाळलं हे माहित नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- हाथरस : “मुलगी करोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा नसती मिळाली”; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य

डीएम यांच्यावर गंभीर आरोप

पीडितेच्या वहिनीनं डीएम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा त्यांनी शवविच्छेदनानंतर पार्थिव दाखवण्याची मागणी केली तेव्हा शवविच्छेदनात काय होतं हे तुम्हाला माहित आहे का असा प्रश्न त्यांनी विचारल्याचे त्या म्हणाल्या. “हातोड्यानं मारून हाडं तोडली जातात. असं शरीर तुम्ही पाहिलं असतं तर तुम्ही १० दिवस जेवलाही नसता. तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम तर मिळाली ना असं त्यांनी अनेकदा विचारलं. तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले, तुम्हाला माहित आहे का?,” असंही त्यांनी विचारल्याचं पीडितेच्या वहिनीनं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 1:31 pm

Web Title: hathras victim family media allowed to meet victim family mother speaks political party dm compensation jud 87
Next Stories
1 पोलीस महासंचालक घेणार हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट; हायकोर्टानं फटकारल्यानंतर धावाधाव
2 “राम मंदिराची पायाभरणी झाली असली तरी उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नाही तर जंगलराज”
3 हाथरस प्रकरण एक ‘छोटासा मुद्दा’, पीडितेवर बलात्कार झाला नाहीः उत्तर प्रदेशातील मंत्र्याचा दावा
Just Now!
X