भूतपिशाच्चाच्या भितीनं एका महिलेने आपल्या पाच मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधीत महिला आणि तिची एक मुलगी यातून बचावले आहेत. मात्र, इतर ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. संबंधीत महिला ही शेतमजूर असून तिचे कुटुंब बऱ्याच काळापासून आर्थिक विवंचनेत होते. गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे.

पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी गीता भलिया या महिलेने पंच पिपला या गावातील विहिरीत उडी घेतली, याची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी पोलिसांना ही खबर दिली. त्यानंतर गीताला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. बचाव मोहिमेदरम्यान, गीता आणि तिची मोठी मुलगी धर्मिष्ठा (वय १०) हीला वाचवण्यात यश आले. मात्र, तिच्या ४ मुलांचा यात मृत्यू झाला. यामध्ये दोन भाऊ आणि दोन बहिणी अशा चार भावंडांचा समावेश आहे. एक वर्ष ते ८ वर्षे वय असलेली ही मुले आहेत.

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर गीताने पोलिसांना सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून आमची आर्थिक स्थिती खूपच बिकट बनली आहे. आम्हाला दोन वेळेचं जेवणही मिळत नाही, त्यामुळे रात्रीची झोपही येत नाही. मला वारंवार जीव द्यावासा वाटत होता मात्र, माझ्यानंतर मुलांच काय होईल या काळजीने पाऊल उचलले नव्हते. मात्र, त्या क्षणी भूतपिशाच्चाने पछाडल्याने आपण डोळे मिटून मुलांसह विहिरीत उडी घेतली.

दरम्यान, तिच्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले की, गीताला सारखे वाटत होते की, तिच्यावर कोणीतही काळी जादू केल्याने आपल्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तिची धडपड सुरु होती. यातूनच तिने हे कृत्य केले असावे.