आपल्या कार्यशैलीतून कंपनीची भरभराट करणाऱ्या जगातील सर्वोच्च १०० मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीत (सीईओ) आठ भारतीयांची वर्णी लागली आहे. ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्य़ू’ने ही यादी प्रसिद्ध केली असून ‘आयटीसी’चे वाय. सी. देवेश्वर आणि ‘ओएनजीसी’चे दिवंगत सुबीर राहा यांनी पहिल्या २० जणांत स्थान पटकावले आहे.
जगातील १०० सर्वोच्च मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीत देवेश्वर हे भारतातर्फे पहिले स्थान पटकावणारे अधिकारी ठरले आहेत. देवेश्वर हे या यादीत सातव्या स्थानी असून राहा यांनी १३ वा क्रमांक पटकावला आहे.
 ‘आयटीसी’चे देवेश्वर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या कारकिर्दीत आयटीसीच्या भागधारकांना १५७४ टक्केइतका परतावा मिळाला असून कंपनीचे बाजारमूल्यही ४५ अब्ज डॉलरने वाढले. या यादीत ‘ओएनजीसी’च्या राहा यांनी १३ वे स्थान पटकावले आहे तर ‘रिलायन्स’चे मुकेश अंबानी २८व्या स्थानावर आहेत.
‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या भांडवली मालमत्तादार कंपनीचे ए. एम. नाईक या यादीत ३२ व्या स्थानावर आहेत तर ‘भेल’चे ए. के. सुरी ३८ व्या स्थानी तर ‘भारती एअरटेल’चे सुनील भारती मित्तल ६५ व्या, ‘जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवर’चे नवीन जिंदाल ८७व्या तर ‘स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’चे व्ही. एस. जैन ८९ व्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, गेल्या १७ वर्षांतील जगातील सर्वोच्च मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ‘अ‍ॅपल’चे स्टीव्ह जॉब्स यांची वर्णी लागली आहे. १९९७ ते २०११ या काळात ‘अ‍ॅपल’चे बाजारपेठेतील मूल्य ३५९ अब्ज डॉलरने वाढले असून भागधारकांना प्रतिवर्षी ३५ टक्के वाढीचा लाभ झाला आहे. ‘अ‍ॅमॅझॉन.कॉम’चे जेफ बेझोस दुसऱ्या तर ‘सॅमसंग’ इलेक्ट्रॉनिक्सचे यून-जाँग-योंग या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. बेलियागाऊरेड एचपीच्या मेग व्हिटमॅन या महिलांमध्ये  सर्वोच्च स्थानी असून या यादीत त्यांनी ९ वे स्थान पटकावले आहे.