म्हणतात ना की, मियाँ-बीवी राजी तो क्या करेगा काझी..असच काहीसं एका जोडप्यासोबत घडलयं. यातील बायको होती अमेरिकेची नागरिक आणि तिथेच राहणारी भारतीय वंशाची मुलगी तर नवरा हरयाणाचा गबरू जवान पण सध्या यूकेमध्ये नोकरी करणारा. यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष विवाह कायद्यांतर्गत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने विवाह नोंदणीकृत करण्यास परवानगी दिली आहे. .

न्यायमूर्ती रितु बहरी आणि न्यायमूर्ती अर्चना पुरी यांच्या खंडपीठाने ९ मार्च रोजी एक न्यायमूर्ती असलेल्या खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देताना हा निर्णय दिला. या जोडप्यास प्रमाणपत्र पुस्तकावर सही करण्यासाठी कोर्टासमोर उपस्थित राहता येणार नसल्यामुळे त्यांच्या लग्नाची ई-नोंदणी नाकारली गेली होती.

डिव्हिजन खंडपीठाने आपल्या आदेशानुसार म्हटले आहे की पत्नी भारतीय उच्चायोग किंवा अमेरिकेच्या नियुक्त रुग्णालयातून व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहू शकेल. याकरिता तिने गुरुग्राम किंवा अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास येथील विवाह अधिका-यांच्याशी सल्लामसलत करून योग्य वेळी ठरवावी.

खंडपीठाने असेही म्हटले आहे की तंत्रज्ञानामुळे दोन्ही पक्षांनी कागदपत्रांची डिजिटलपणे पडताळणी करून घ्यावी आणि ती सुरक्षितपणे पाठवून द्यावीत. अमी रंजन आणि त्यांची पत्नी मिशा वर्मा यांनी खंडपीठाच्या आधीच्या आदेशाला आव्हान देताना न्यायालयात धाव घेतली होती.

अमीर रंजन २०१७ पासून लंडनमधील एका फर्ममध्ये आयटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून मिशा भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक असून ती अमेरिकेत राहत आहेत, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील नवनीती प्रसाद सिंह आणि नितीन कांत सेतिया यांनी केला आहे. ती व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. गुरुग्राम (हरियाणा) येथे आपापल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हिंदू संस्कारानुसार ७ डिसेंबर, २०१९ रोजी अपीलकर्त्यांनी विवाह केला होता. लग्नानंतर दोघे अनुक्रमे १० डिसेंबर आणि १५ डिसेंबर २०१९ रोजी यूके आणि अमेरिकेत आपापल्या संबंधित ठिकाणी परतले. त्यांच्या लग्नाच्या नोंदणीसाठी २९ जानेवारी, २०२० रोजी गुरुग्राम विवाह अधिका याकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. लग्नाच्या नोंदणीसाठी मीशाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. विवाह अधिका-यांनी अपील करणार्‍यांना ३ एप्रिल २०२० रोजी हजर होण्यास सांगितले होते. दरम्यान, कोविड -१९ या साथीचा रोगामुळे आणि त्यानंतर भारत सरकारने घातलेल्या लॉकडाऊनमुळे हे दोघेही भारतात परत येऊ शकले नाहीत.

याच कारणास्तव, अमी रंजन यांनी ७ ऑगस्ट २०२० रोजी विवाह-अधिका-यांना विनंती केली की, दुसरी सुनावणीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होऊ शकेल का. ११ सप्टेंबर २०२० रोजी ही विनंती नाकारली गेली होती.