स्वयंघोषित गुरू आसाराम आणि त्याचा पुत्र नारायणसाई यांनी दाखल केलेल्या याचिका मागे घेतल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या. सुरत येथील दोन बहिणींनी या दोघांविरोधात लैंगिक अत्याचारप्रकरणी दाखल करण्यात आलेले प्राथमिक आरोपपत्र रद्दबातल ठरविण्यात यावे, अशी विनंती आसाराम व नारायणसाई यांच्या वतीने करण्यात आली होती.
आसाराम व साई यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद सोमवारी संपला. दोघांच्या वकिलांनी संबंधित याचिका मागे घेण्याची विनंती केल्यानंतर न्या. ए. जे. देसाई यांनी अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणातील तपासकाम संपल्यानंतर नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा अर्जदारांना असल्याचे न्यायालयाने सांगितले. सन १९९७ ते २००६ या सात वर्षांच्या कालावधीत आसाराम याने अहमदाबादच्या बाहेर असलेल्या आश्रमात आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्या दोघींपैकी मोठय़ा बहिणीने केली, तर नारायणसाई यानेही २००२ ते २००५ च्या दरम्यान, सुरत येथील आश्रमात आपल्यावर असेच अत्याचार केल्याची तक्रार धाकटय़ा बहिणीने केली आहे.